बल्लारपूरमध्ये अनाधिकृत मांस विक्रेत्यांवर २४ सप्टेंबरपासून धडक कारवाई

Fri 26-Sep-2025,02:38 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात अनाधिकृतपणे मांस, मटण व मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर २४ सप्टेंबर २०२५ पासून दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील विविध ठिकाणी व मुख्य रस्त्यावर अनेक विक्रेते परवानगीशिवाय मांस विक्री करत असून, त्याबाबत अस्वच्छतेच्या तक्रारी नगर परिषदेच्या कार्यालयात सातत्याने प्राप्त होत होत्या. स्वच्छता निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत या ठिकाणी अत्यंत अस्वच्छता आढळून आली. तसेच, टाकाऊ मांस उघड्यावर टाकल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले.

काही विक्रेते धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरात व्यवसाय करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

याबाबत नगर परिषदेकडून सर्व विक्रेत्यांना सूचित करण्यात आले होते की, व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दुकानाचे मालकीहक्क कागदपत्रे किंवा वार्षिक भाडेकरार, धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरात व्यवसाय न करण्याचे स्वघोषणापत्र, स्वच्छतेचे पालन व टाकाऊ मांस नगर परिषदेच्या घंटागाडीतच टाकण्याची अट पूर्ण करावी लागेल. त्याचबरोबर वार्षिक १००० रुपयांचे शुल्क भरून व्यवसाय परवाना घेणे आवश्यक आहे.

या अटींचे पालन न करणाऱ्या व अनधिकृतपणे व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या सर्व विक्रेत्यांवर २४ सप्टेंबरपासून धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बल्लारपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिला आहे.