मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना टिप्पर ने चिरडले

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली: सर्व मुले काटली येथील रहिवासी असून, सकाळी साडेचारच्या सुमारास साखरा गावाजवळील रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना त्यांना ही धडक बसली टिप्पर गडचिरोली ते आरमोरी कडे जात होते. या अपघातात तन्वीर बालाजी मानकर वय (१६) टिकू नामदेव भोयर वय (१५) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दूषण दुर्योधन मेश्राम वय (१४) तुषार राजू मारबते वय (१४) या दोघांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघातग्रस्त क्षितिज मेश्राम आणि आदित्य कोपरे गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर रेफर करण्यात आलं आहे. आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने अपघात स्थळी भेट दिली व मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ततपूर्वी जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोन जखमींना नागपूर येथे हेलिकॉप्टरने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थ भावनिक अवस्थेत होते. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल," असे आश्वासनही त्यांनी दिले.
शासनाकडून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांना मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून चार लाख रुपये मदत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण विभागाने अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा नियमाप्रमाणे देय लाभमृतांच्या परिवाराला तात्काळ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.