क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

Fri 08-Aug-2025,04:48 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

अल्लीपुर:गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या डिसेंबर-जानेवारी मध्ये होत आहे मात्र त्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. व्हीव्हीपॅट मशीनशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत याबाबत आज दिनांक सात ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने किरण ठाकरे यांचे नेतृत्वात तहसीलदार देवळी यांना निवेदन देण्यात आले व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद इ.) निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनशिवाय मतदान प्रक्रिया राबवू नये अशी मागणी करण्यात आली.अलीकडील काही निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) योग्यरित्या कार्यरत नसल्याचे, मतदानात अनियमितता झाल्याचे आणि मतमोजणीत विवाद निर्माण झाल्याचे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी, राजकीय पक्षांनी मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदारांच्या मताला खरा अर्थ प्राप्त व्हावा आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह व्हावी यासाठी प्रत्येक EVM सोबत VVPAT मशीनचा वापर अनिवार्य करावा अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचेसह प्रविण कात्रे, माजी नागराध्यक्ष गौतम पोपटकर, स्वप्नील मदनकर, शिंदेसेनेचे निलेश तिडके, सरपंच विनोद दांदडे, दिलीप फुलमाळी, मंगेश वानखेडे, कौस्तुभ पाचडे व इतर अनेक नागरिक उपस्थित होते.