राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय परेडसाठी विशेष अतिथी म्हणून सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना मानाचे आमंत्रण

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-१५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय परेड समारंभास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी स्मार्ट ग्रामपंचायत भजेपारचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांना मानाचे आमंत्रण मिळाले आहे. विशेष म्हणजे, ते सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ सरपंचांना या मानाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून यात, गोंदिया जिल्ह्यातून सरपंच चंद्रकुमार बहेकार यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा आणि सालेकसा तालुक्याचा गौरव वाढला आहे.या विशेष निमंत्रणाबद्दल सरपंच बहेकार यांनी भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग, गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती सालेकसा प्रशासन आणि सेवेची संधी देणाऱ्या ग्रामपंचायत भजेपार येथील ग्रामस्थांचे विशेष मन:पूर्वक आभार मानले आहे.भजेपार ग्रामपंचायत तर्फे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि सेवाभावी उपक्रमांची दखल घेऊन ही सन्मानाची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत भजेपार ग्राम पंचायतीला मागील अडीच वर्षांत माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार ५० लाख रुपये, जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार ५० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा स्तरीय तिसरे पुरस्कार (वर्ष २०२२- २३) ३.६० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार (वर्ष २०२४- २५) ६.६० लाख रुपये असे एकंदरीत १.१० कोटी रुपयांचे पुरस्कार प्राप्त झाले असून ग्रामपंचायत भजेपार अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रास "सुंदर माझा दवाखाना, कायाकल्प आणि टीबीमुक्त पंचायत पुरस्कार प्राप्त झाले या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रमांमुळे आणि विशेषतः भजेपार चषक आंतर राज्यीय महिला पुरुष कबड्डी स्पर्धेमुळे या गावाची एक वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे.