ऑटो रिक्षा चालकांसाठी सुविधांचा मोठा निर्णय

Sat 09-Aug-2025,07:54 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर: जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या समस्या आणि मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा चालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि चालकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले.आ. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले की, महानगरपालिका अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून व्यापारीदृष्ट्या उपयुक्त ठिकाणी ऑटोस्टॅण्ड विकसित करावेत. या स्टॅण्डमध्ये वाहतूक सुलभता, पार्किंग व इतर सुविधा यांचा विचार करून डिझाइन करण्यात यावे. बल्लारपूर, मुल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती व गोंडपिपरी येथे देखील अशा ठिकाणांची पाहणी करून नियोजन केले जाईल. यासाठी निधी रस्ते सुरक्षा योजना-२०१६ व डीपीडीसी अंतर्गत उपलब्ध होईल.ई-रिक्षा केवळ गरजू आणि पात्र व्यक्तींनाच देण्यात याव्यात, यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण धोरण तयार करेल. ई-रिक्षा ठराविक मार्गावरच चालवण्याचा प्रस्ताव असून, त्यासंबंधी मार्गदर्शक सूचना लवकरच जारी होतील. सर्व वितरकांची यादी तयार केली जाईल. सध्या अस्तित्वात असलेल्या ३१ रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढवून बंगाली कॅम्प परिसरात दोन नवीन स्टॅण्ड विकसित करण्यात येतील.ऑटो रिक्षा चालक हे केवळ वाहतूक सेवा पुरवणारे नसून शहराच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठोस आणि समन्वयात्मक निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे. शासन आणि चालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, यासाठी हे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणले जातील, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीस संजीव रेड्डी बोदकूरवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, नम्रता आचार्य ठेमसकर, अजय सरकार, बंडू गोरकार, ऑटो मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर राऊत, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.