सी सर्ट परीक्षेत बिडकर महाविद्यालयाचे घवघवीत यश अल्लीपूरच्या तीन विद्यार्थ्यांचा विशेष गौरव; भारतीय सेनेत भरतीसाठी खुला मार्ग

Sun 13-Jul-2025,12:43 AM IST -07:00
Beach Activities

 प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लपुर )

रा. सुं. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगणघाट येथील एनसीसी कॅडेट्सनी 21 महाराष्ट्र बटालियन, वर्धा मार्फत घेण्यात आलेल्या एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट परीक्षेत उत्तम कामगिरी करत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.लेफ्टनंट डॉ. रमेश एम. भगत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एकूण २८ कॅडेट्स या परीक्षेत यशस्वी झाले असून, त्यातील अल्लीपूरचे केतन अनिल हिंगे, साहिल गजानन ढगे आणि भूषण दिलीप बावणे या तीन विद्यार्थ्यांनी खास उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सेना व सरकारी भरतींसाठी खुली दारे

या यशस्वी कॅडेट्सना आता भारतीय सैन्य, पॅरामिलिटरी (SRPF, CRPF), वन विभाग यांसारख्या शासकीय सेवांमध्ये बोनस गुण मिळणार असून, सेनेच्या लेखी परीक्षेपासून सूट मिळते. त्यांना फक्त शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, ही आनंददायक बाब आहे.

गुणवंत कॅडेट्सचा सत्कार समारंभ

11 जुलै 2025, शुक्रवार रोजी महाविद्यालयात या गुणवंत कॅडेट्सचा सत्कार सोहळा पार पडला. प्राचार्य डॉ. बी. एम. राजुरकर, लेफ्टनंट डॉ. रमेश एम. भगत, केअरटेकर श्री. चंद्रशेखर कुटे, आणि प्रा. डॉ. सुशांत मस्के यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.