हिंगणघाट शहरात ‘जीवरक्षक फाउंडेशन’चे जीवदायी कार्य – दोन दुर्मीळ, निमविषारी सापांना जीवदान

Sun 13-Jul-2025,12:50 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी सुनिल हिंगे, अल्लीपूर

दि. १३ जुलै २०२५ रोजी हिंगणघाट शहरात दोन दुर्मीळ आणि निमविषारी सापांना ‘जीवरक्षक फाउंडेशन’च्या सर्पमित्रांनी यशस्वीरीत्या रेस्क्यु करून जीवदान दिले. या मोहिमांमध्ये सर्पप्रेम, शास्त्रीय माहिती आणि वन्यजीव संवर्धनाची भावनादेखील प्रकर्षाने दिसून आली.

‘भारतीय अंडीभक्षक साप’ – दुर्मीळ पण पर्यावरणासाठी महत्त्वाचा

शहरातील पटवारी कॉलनी भागात रेस्क्यु टीम सदस्य भाविक कोपरकर आणि सहकारी सौरभ राऊत यांनी ‘भारतीय अंडीभक्षक साप’ यशस्वीपणे पकडला. या सापाची खासियत म्हणजे तो फक्त पक्ष्यांची अंडी खाऊन उपजीविका करतो – इतर कुठलेही भक्ष्य तो खात नाही.हा साप वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत 'अनुसूची 1' मध्ये समाविष्ट आहे, म्हणजेच याचे संरक्षण वाघाइतकंच महत्त्वाचं आहे. झुडपी जंगलांची नासधूस आणि अतिक्रमणामुळे या सापांचा अधिवासही संकटात आहे, असे सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले.

‘हरणटोळ साप’ – रंगबदलाचा मास्टर, पण निरुपद्रवी

त्याच दिवशी भारतीय विद्या भवन शाळेत साप असल्याची माहिती मिळाल्यावर सर्पमित्र राकेश झाडे व चेतन गावंडे घटनास्थळी पोहोचले आणि ‘हरणटोळ’ या सापाची सुरक्षित रेस्क्यु केली.हा साप निम्नविषारी असून पूर्णपणे निरुपद्रवी आहे. त्याचा रंग हिरवा, पिवळसर किंवा तपकिरी असतो आणि त्याची जीभ लांब व गडद हिरवी असून, ती तो आजूबाजूची परिस्थिती समजून घेण्यासाठी वापरतो.

सापांना दिले जंगलात मोकळं आयुष्य

रेस्क्यु करण्यात आलेले दोन्ही साप सुरक्षितपणे वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात आले. हे कार्य नुसतेच धाडसी नव्हे तर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.