स्वच्छ भारत अभियानाच्या प्रकल्पालाच लागलेय घाणीचं ग्रहण! – दोन वर्षांपासून अपूर्ण प्रकल्पामुळे संतप्त नागरिक

Mon 07-Jul-2025,11:56 PM IST -07:00
Beach Activities

सुनिल हिंगे, ( अल्लीपूर )

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अल्लीपूर ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सुरू केलेला प्रकल्प तब्बल दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे. १६ लाख रुपयांचा अंदाजित खर्च असलेला हा प्रकल्प आजतागायत पूर्णत्वास आलेला नाही.

सध्या या प्रकल्पाअंतर्गत फक्त एक शेड उभारण्यात आला आहे, आणि त्यामध्ये कचरा पुनर्वापर यंत्र बसवण्यात आले असले, तरीही ते यंत्र आजतागायत सुरूच झालेले नाही. स्मशानभूमीजवळील या ठिकाणी गावातील संपूर्ण कचरा टाकण्यात येतो, मात्र प्रक्रिया न झाल्याने तिथे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत.

या घाणीमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देशच हरवत चालल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासक तुषार जोगी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, “रिसायकलिंग मशीन बसवण्यात आली असून ती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.”

ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनीही माहिती देताना सांगितले, “मशीन बसवण्यात आली आहे. प्रकल्प लवकर सुरू केला जाईल. महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिला बचत गटाकडे कामकाज सोपवण्याचा विचार करण्यात आला आहे.”

तरीही, स्थानिक नागरिकांचा प्रश्न कायम आहे – "दोन वर्षांपासून थांबलेली ही प्रक्रिया अजून किती दिवस थांबवली जाणार?"