शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी

Wed 22-Oct-2025,09:58 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज बल्लारपूर तालुक्यात शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी असा अनोखा आंदोलनात्मक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविमा, हमीभाव, पीकखरेदी व अनुदानाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाहीत. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्याने त्यांच्या घरात सणाऐवजी अंधार पसरला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर आणण्यासाठी शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी असा निर्णय घेतला.

या उपक्रमांतर्गत बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावरच काळ्या फडक्याखाली भाकर, पिठलं आणि ठेचा खाऊन शांततामय पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांनी हातात फलक घेत शेतकऱ्यांना न्याय द्या, अनुदान द्या, थकलेले पैसे तातडीने जमा करा अशा घोषणा दिल्या.

या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रदेश पदाधिकारी सचिव घनश्याम मुलचांदनी, शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सय्यद, तसेच भास्कर माकोडे, प्रणेश अमराज, रवी देरकर, सुरेश बोप्पानवार, तुळशीराम पिपरे, सुरेश वासाडे, नरेश बुरांडे, वासुदेव येरगुडे, शेखर आलम, जिवंकला आलम, भास्कर कावळे, सूर्यकांत दयालवर, नाजुका आलम, सुनील कोहरे, कैलाश धानोरकर आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सण सरकारने हिरावून घेतला आहे. पिकाचे दर मिळत नाहीत, विम्याचे पैसे अडकले आहेत, विजेचे बिल वसुलीच्या नोटिसा आल्या आहेत. तरीही सरकार शांत आहे. अशा निष्काळजी प्रशासनाविरुद्ध काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे वक्त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पुढील काळातही रस्त्यावर उतरेल आणि शासनाने थकित रक्कम तातडीने देण्याचे आश्वासन न दिल्यास जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनामुळे तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती.