दत्ताच्या दिंडीत आ. उमेश यावलकर यांची उपस्थिती

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला
आमदार उमेश यावलकर हस्ते दिंडीकरांचा सन्मान
वरूड:मागील कित्येक वर्षांपासून दत्ताच्या दिंडीत भक्तांच्या वाढत्या प्रतिसादामुळे दिंडीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दिंडीत रविवार दि.१९ ऑक्टोबर रोजी वरूड मोर्शीचे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांचाही सहभाग दिसून आला. टाळ, मृदुंगाच्या आवाजात मंत्रमुग्ध होणाऱ्या भाविकांमध्ये आ.यावलकर यांनी सुद्धा गळ्यात टाळ टाकत भक्तीत मग्न झाल्याचे दिसून आले. सर्वप्रथम त्यांनी विनावादक, मृदुंगवादक यांच्यासह टाळवादक यांचे अक्षीद व बुका लावुन चरण स्पर्श केले व सर्व दिंडीकरांचा सन्मान केला तसेच गळ्यात टाळ घालून दिंडीत सहभागी झाले. दत्त मंदिरात जाऊन दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसांपासून वर्षानुवर्षे निघणारी पहाटेची दत्ताची दिंडी अंखडीतपणे आजही सुरू आहे. पहाटेच्या या दिंडीला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात झाली असल्याने शहरातील पहाट दत्ताच्या गजराने होत आहे. यामुळे पहाटे पहाटे दत्तांचा गजर, विना, टाळ, मृदंगाचा नाद कानाकोपऱ्यातील नागरिकांच्या कानावर पडत असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येते आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्तिक महिन्यामध्ये काकड आरतीला फार महत्त्व असल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर सर्वत्र निनादत आहे. विशेष करून गावखेड्यात ब्रम्हमुहुर्तावर काकड आरतीचे सूर गुंजत आहेत.
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्यावेळी केलेली आरती, त्रिपुरारी पोर्णिमेपर्यंत या दिंडीचा अखंड गजर सुरू असतो. सर्वप्रथम दत्त मंदिरात गणेश आरती व दत्ताची आरती करून या दिंडीची पहाटे ५ वाजता सुरवात होते व सकाळी ७ वाजताच्या सुमारास समाप्ती करण्यात येते. कार्तिक पोर्णिमेच्या आधल्या दिवशी महाप्रसादाचे वितरण करण्यात येते व दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा काढुन समाप्ती करण्यात येते. अशा पद्धतीने कार्तिक महिन्यात शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आ.यावलकर यांनाही या भक्तीमय वातावरणाचा मोह आवरला नाही असे त्यांच्या उपस्थितुन दिसुन आले.