यशवंत महाविद्यालयात जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन

Sat 18-Oct-2025,06:04 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा (17 ऑक्टोबर 2025) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत महाविद्यालय, वर्धा आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “75 वर्षांत भारतीयांमध्ये घटनात्मक लोकशाही रुजली आहे का?” या विषयावर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन समीरभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. रवींद्र बेले, स्पर्धा संयोजक प्रा. एकनाथ मुरकुटे, डॉ. रायन महाजन आणि प्रा. प्रियंका गावडे उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना समीरभाऊ देशमुख म्हणाले की, “अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. लोकशाहीच्या यशासाठी वादसंवाद आवश्यक आहे.” प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी सांगितले की, “वादविवाद स्पर्धा हा विद्यार्थ्यांसाठी विचारमंथनाचा एक महत्त्वाचा मंच आहे. संविधान समजून घेणे आणि लोकशाही प्रक्रियेचे ज्ञान वाढवण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बेले यांनी स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी मांडली.

या स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील 20 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विषयाच्या अनुकूल आणि विरोधात ठोस मते मांडली. काही विद्यार्थ्यांनी लोकशाही भारतीयांच्या जीवनात रुजल्याचे सांगितले, तर काहींनी भ्रष्टाचार, गुन्हेगारी राजकारण, जातीयवाद आणि धर्माचा वापर या कारणांमुळे लोकशाही अजूनही अपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.

स्पर्धेत यशवंत महाविद्यालय, वर्धा येथील कोमल व-हाडे आणि वैष्णवी पटवा यांनी प्रथम पारितोषिक, तर जे.बी. विज्ञान महाविद्यालय, वर्धा येथील प्रसाद जांभुळकर आणि श्रावणी ईटनकर यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन नागपूर येथील अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. संजय धोटे, प्रा. राठोड, आणि डॉ. अभिजित वाघाडे यांनी केले.

आयोजनात प्रा. अमित जाधव, प्रा. सचिन सोनटक्के, रियाज शेख, प्रदीप चव्हाण, तसेच राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.