नेत्रहीन व अपंग घटकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने द्यावे प्राधान्य – इम्रान राही
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा आर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी, ज्यामध्ये नेत्रहीन व अपंगांचा समावेश आहे, अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमधून स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य तसेच विविध सुविधा पुरवल्या जातात. विशेषतः व्यवसायासाठी थेट भूखंड वाटपाचे धोरण हे दिव्यांगांसाठी मोठा दिलासा देणारे ठरले आहे.
तथापि, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले तरणदीपसिंग प्रकाश बावरी यांनी अनेक वेळा शासनाकडे मागणी करूनही न्याय न मिळाल्याने अखेरीस आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला ही अत्यंत खेदजनक बाब आहे. समाजात दुर्लक्षित आणि उपेक्षित असणाऱ्या नेत्रहीन व अपंग व्यक्तींना शासनाने सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान राही यांनी व्यक्त केले.
ते आर्वी येथे उपोषणस्थळी तरणदीपसिंग प्रकाश बावरी यांना भेट देत होते. या प्रसंगी डॉ. हेलनकेअर अंध व अपंग बहुउद्देशीय संस्थेचे सल्लागार श्यामसुंदर राठी, जेष्ठ समाजसेवी प्रेमराज पालीवाल, अब्दुल गणी, इंजि. विजय नाखले, प्रकाश बावरी, सय्यद फारुख, कादिर खान, रामेश्वर बलपांडे, गजानन केतकर, प्रीतकौर बावरी आदी मान्यवर उपस्थित होते.
इम्रान राही यांनी प्रशासनाला आवाहन केले की, तरणदीपसिंग प्रकाश बावरी यांची मागणी तातडीने निकाली काढून त्यांना उपोषणातून मुक्त करावे आणि दिव्यांग घटकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे.