विसापूरकरांचा स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापुर गावातील तीन हजारांवर विज ग्राहकांकडे महावितरण कंपनीने जुने विज मीटर बदलून स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, हा प्रकार ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या कुचंबणारा असल्याने विसापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने ठराव पारित करून या मीटरला विरोध दर्शविण्यात आला.जुन्या विज मीटरमध्ये कोणताही बिघाड नसतानाही केवळ कंत्राटदार कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून स्मार्ट मीटर लावले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी सभेत केला. उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी हा मुद्दा मांडताच सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दर्शविला.
गावातील घरगुती विज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावू नयेत, यासाठी महावितरण कंपनीचे बल्लारपूर उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर करण्याचे ठरले. तसेच हा ठराव ऊर्जा मंत्री यांच्यापर्यंतही पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील विज ग्राहकांचे जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यासाठी महावितरण कंपनी ने २१ सप्टेंबर २०२३ रोजी फर्मान जाहीर केले आहे.
त्यानुसार मे. अदानी कंपनीला भांडूप, कल्याण व कोकण विभागात ६३ लाख ४४ हजार ०६६ व बारामती आणि पुणे विभागात ५२ लाख ४५ हजार ९१७, एनसीसी कंपनीला नाशिक व जळगाव विभागात २८ लाख ८६ हजार ६२२ आणि लातूर, नांदेड व औरंगाबाद विभागात २७लाख ७८ हजार ७५९, मे. मोर्टकार्लो कंपनीला चंद्रपूर, गोंदिया व नागपूर विभागात ३० लाख ३० हजार ३४६ तर जिनस कंपनीला अकोला व अमरावती विभागात २१ लाख ८६ हजार ६३६ इतके स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचे कंत्राट दिले आहे.हा प्रकार राज्यातील विज ग्राहकांचे जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचा प्रकार विज ग्राहकांची आर्थिक कुचंबणा करणारा आहे. यामुळे आम्ही विसापूरकरांनी स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध केला आहे असे अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांनी म्हंटले आहे.सभेला सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुरज टोमटे, सुनील रोंगे, दिलदार जयकर, सुरेखा ईटनकर, सुवर्णा कुसराम, विद्या देवाळकर व शशीकला जीवने उपस्थित होते.