वरूड मोर्शी मतदार संघात तिन पोलिस चौकी निर्मितीला अखेर गृहविभागाने दिली मान्यता

Wed 01-Oct-2025,01:15 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला 

.उमेश यावलकर यांच्या पाठपुराव्याला यश !

वरूड: वरूड व मोर्शी तालुक्यातील पोलिस स्टेशन हद्दीतील गावांची संख्या पहाता तेथील वाढत्या लोकसंख्येचा व भौगोलिक अडचणीचा विचार करता, त्या त्या भागातील वाढती गुन्हेगारी, दिवसेंदिवस फोफावत असलेले अवैध धंदे, महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर कायदेशीररित्या नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच दिवसेनदिवस पोलिस यंत्रणेवर येणारा वाढता ताण लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी,अशा संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरूड मोर्शी मतदार संघाचे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांनी आमदार झाल्यापासून गृहमंत्रालयाकडे अतिरिक्त पोलिस चौकी च्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले असून मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील हिवरखेड , वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील राजुरा बाजार व शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पुसला येथे नव्याने पोलिस चौकी उभारण्याकरिता शासन मान्यता देण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आजपावेतो दहा ते बारा किलोमीटरचे अंतर कापुन पोलिस स्टेशन गाठावे लागत होते, ते आता त्यांच्याकरीता अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आ.यावलकर यांचे आभार मानले आहे.

वरूड व मोर्शी या दोन तालुक्यात एकुण पाच पोलिस स्टेशन आहेत. यामध्ये मोर्शी, शिरखेड, वरूड, बेनोडा, शेंदुरजनाघाट या मुख्यशहरांचा समावेश आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील हिवरखेड, वरूड मधील राजुरा बाजार, शे.घाट मधील पुसला येथील ग्रामस्थांची अतिरिक्त पोलिस चौकीची मागणी धुळखात होती. याबाबत आ.यावलकर यांना पत्रव्यवहार करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आ.यावलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यानंतर गृहविभागाने अतिरिक्त नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिन पोलिस चौकीच्या निर्मितीकरिता मान्यता दिली. त्यामुळे आ.यावलकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.