आरक्षण सोडतीनंतर महिला नेतृत्वाला संधी : बल्लारपूर समितीला पुन्हा महिला सभापती

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर :बल्लारपूर पंचायत समिती १४ मार्च २००२ रोजी अस्तित्वात आली. तेव्हापासून सात जणांनी सभापती पदाची जबाबदारी पार पाडली आहे. नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनंतर हे पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्याने चौथ्यांदा महिला सभापती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.पंचायत समितीच्या स्थापनेनंतर विसापूर येथील वैजयंती दिलीप सोनटक्के या पहिल्या महिला सभापती झाल्या. त्यांनी १४ मार्च २००२ ते ९ फेब्रुवारी २००५ पर्यंत कार्यभार सांभाळला. त्यानंतर ईटोली येथील चंद्रकला नरेंद्र बोबाटे या १५ सप्टेंबर २०१४ ते १३ मार्च २०१७ दरम्यान सभापती राहिल्या. तिसऱ्या महिला सभापती म्हणून मानोरा येथील इंदिरा रमेश पिपरे यांनी १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२२ पर्यंत सत्ता राखली.
आता पुन्हा अनुसूचित जमाती महिला सभापती पद भूषविणार असून त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. विशेष म्हणजे, आतापर्यंत हे पद एकदा शिवसेना व दोनदा भाजप पक्षाच्या उमेदवारांकडे राहिले आहे. बल्लारपूर पंचायत समितीत विसापूर, बामणी, कोठारी व पळसगाव असे चार गण आहेत. या गणांपैकी कोणत्या गणात अनुसूचित जमाती महिलेसाठी सभापती पद राखीव असेल हे येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीत निश्चित होणार आहे.बल्लारपूर पंचायत समितीत भाजपा विरुद्ध काँग्रेसमध्ये थेट लढत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले असून पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर-बामणी व कोठारी-पळसगाव असे दोन जिल्हा परिषद गट असून, पंचायत समितीचे विसापूर, बामणी, कोठारी व पळसगाव असे चार गण आहेत. आजवर येथे मुख्य लढत भाजप व काँग्रेसमध्येच झाली आहे.
राजकीय धुरीणांच्या अंदाजानुसार, या वेळीही थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पद देखील बल्लारपूर तालुक्याला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.