धोत्रा चौकात भीषण अपघात : ट्रकची जोरदार धडक, दुचाकीस्वार युवक ठार, वडील गंभीर जखमी

प्रतिनिधी : सुनिल हिंगे, ( अल्लीपूर )
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मार्गावर ३० जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास धोत्रा चौकात भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एक युवक जागीच ठार झाला असून त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
मृत युवकाचे नाव योगेश शंकर महाजन (वय २९, रा. एकुर्ली) असून, गंभीर जखमी वडिलांचे नाव शंकर महाजन (वय ५०) आहे. दोघेही एमएच ३२ एव्ही ९६९२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून सोनेगाव स्टेशनकडे जात असताना धोत्रा चौक ओलांडत होते. त्याचवेळी वर्ध्याहून हिंगणघाटकडे भरधाव वेगाने निघालेल्या एमएच १६ सीसी ७५७५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत योगेशचा जागीच मृत्यू झाला तर शंकर महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निष्काळजी ट्रकचालकाला अटक
अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रकचालक राकेश राजपूत (वय ३४) याला अटक केली. पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अजय रिठे आणि निखिल वासेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस ठाणे करीत आहे.
स्थानिकांमध्ये संताप
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रकचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. धोत्रा चौक परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.