दिवसा ढवळ्या लूट-मार महिलांमध्ये भिती चे वातावरण

Sat 14-Jun-2025,03:38 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :-अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली :वसमत शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे.काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी ता. १३ घडली. या घटनेने शहरात खरेदी निमित्त व कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोखर्णी जिल्हा परभणी येथील साधना वाघ ह्या वसमत येथील नातेवाईकाकडे लग्न कार्यासाठी आल्या होत्या. दरम्यान शुक्रवारी साधना वाघ व नातेवाईक महिला लग्नाच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत आल्या होत्या. सायंकाळी ४ च्या सुमारास त्या खरेदी करुन घराकडे निघाल्या असता विष्णू नगरात दोन व्यक्ती असलेली काळ्या रंगाची दुचाकी समोर आली. यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने रुमालाने आपले तोंड झाकुन घेतलेहोते. त्यांनी आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून चोरट्याने साधना वाघ यांच्या पाठिमागून दिड तोळ्याचे गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीवर पोबारा केला. काही कळायच्या आत हा प्रकार घडल्याने साधना वाघ ह्या घाबरुन गेल्या. इतरत्र आवाज दिला मात्र चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा साधना वाघ यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. त्यासाठी शोध पथके तैनात करण्यात आली आहे.वसमत शहरात पल्सर दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरुन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. सकाळी फिरायला निघालेल्या महिन्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवली होती. यानंतर शहरातील वस्तीमध्ये ही सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे दिसत असलेतरी अद्याप हे चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत हे विशेष.सोनसाखळी चोरीच्या घटनांनी वसमत शहरात महिलांमध्ये चोरांची दहशत पसरली आहे.