कराटे खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे – अनिल निमगडे

Wed 29-Oct-2025,11:21 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ चे भव्य उद्घाटन वर्ध्यात

वर्धा : आजच्या पिढीला शालेय शिक्षणासोबतच साहस, शौर्य आणि आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. नवी, निर्भय आणि सक्षम पिढी घडविण्याच्या दृष्टीने कराटे सारख्या खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले.

ते २८ ऑक्टोबर २०२५ रोजी, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा तसेच वर्धा तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही होते. प्रमुख अतिथी म्हणून कोशी उल्हास वाघ, सिहान मंगेश भोंगाडे, महेश गावंडे, साहिल वाघ, दिलीप कठाणे, चेतन जाधव, अभिजीत पारगावकर, पुजा गोस्टकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे हा खेळ अत्यंत उपयुक्त ठरत असून तो व्यक्तीच्या आत्मविश्वासासह शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही लाभदायक आहे, अशी भावना इमरान राही यांनी व्यक्त केली.

यावेळी महेश गावंडे आणि कोशी उल्हास वाघ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना सिहान मंगेश भोंगाडे यांनी केली. सूत्रसंचालन अमोल मानकर यांनी केले तर आभार वेदांत चौधरी यांनी मानले.

कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक अब्दुल सईद, ऐजाज शेख, रचनिल राऊत, गौरव चैनानी, हिमांशू ढोक, अॅड. सुनैना भगत,सुरज राजपुत,साहिल तराळे, प्रेम तवंर,आर्यण छापेकर, आरित मानकर,गोविंद शर्मा, कैवल्य सागरकर आदी मान्यवर उपस्थित होते.