कारंजा–धावडी रस्त्याची झाली चाळण! नागरिक संतप्त — नागरी संघर्ष समितीने दिला आंदोलनाचा इशारा
नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा (घा.) कारंजा शहरातून धावडी या गावाला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधून निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
धावडी मार्गाने कारंजा शहरात प्रवेश करताना नवीन लेआउटपासून महामार्ग क्रमांक ६ पर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गाने दररोज शाळा–महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक आणि शेतकरी प्रवास करतात. खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना सायकल चालवणे अवघड झाले असून, अनेकदा अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
शेतकऱ्यांना शेतीसाठी बंडी, बैल, जनावरे घेऊन या रस्त्याने ये–जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही परिस्थिती तातडीने दूर करण्याची मागणी समितीने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “पुढील सात दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर प्रतीकात्मक खड्डा पूजन आंदोलन करण्यात येईल.” तसेच, पुढील दोन महिन्यांत रस्त्याचे पक्के डांबरीकरण न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन उपविभागीय अभियंता एफ. एस. मुल्ला, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, कारंजा यांनी स्वीकारले. निवेदन देताना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “रस्त्याची दुर्दशा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली असून, त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा नागरीक रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”