स्वच्छतेचा बोजवारा! रमणा ग्रामपंचायतीचे अपयश उघड

Sun 01-Feb-2026,02:58 AM IST -07:00
Beach Activities

स्वच्छतेचा बोजवारा! रमणा ग्रामपंचायतीचे अपयश उघड

‘फक्त पाच हजार शिल्लक’ म्हणत प्रशासनाची हातझटकग्रा, मपंचायत निधी गेला तरी कुठे? ग्रामस्थांचा थेट सवाल

वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

(ता. सेलू, जि. वर्धा ) रमणा गावातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. गावातील प्रमुख रस्त्यावर सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर झुडपी झाडे वाढली आहेत. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या रस्त्यावरून ये-जा करताना अपघाताचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी रमणा ग्रामपंचायत व ग्रामसेवक विद्याताई जिवतोडे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नसून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीकडून सध्या “ग्रामपंचायतकडे फक्त पाच हजार रुपये शिल्लक आहेत” असे उत्तर दिले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र मग ग्रामपंचायतीचा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा थेट सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील स्वच्छता राखणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य असताना प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरत आहे. तातडीने रस्त्यावरील घाण साफ करून झुडपी झाडांची कटाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी ग्रामवासीयांनी दिला आहे.