सिंदी रेल्वेतील अवैध दारू विक्रेते गौरव दिक्षीत आणि शारीक शहा यांना दोन वर्षांसाठी तडीपार — पोलीस अधीक्षक वर्धा यांचा आदेश

Mon 03-Nov-2025,06:42 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:सिंदी रेल्वे येथील अवैध दारू विक्रेते गौरव दिक्षीत आणि शारीक शहा या दोघांना दोन वर्षांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक वर्धा यांनी जारी केला आहे.

गौरव दिक्षीत (रा. विजय कॉलनी, सिंदी रेल्वे) आणि शारीक शहा (रा. लादेननगर, सिंदी रेल्वे) हे दोघे नागपूर जिल्ह्यातून अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करून सिंदी परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असत. त्यांच्या विरोधात वारंवार गुन्हे दाखल करूनही त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे तर्फे तडीपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे सादर करण्यात आला. सदर प्रस्ताव मान्य करून दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी गौरव दिक्षीत आणि शारीक शहा यांना वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार केलेले व्यक्ती वर्धा जिल्हा सीमा हद्दीत आढळल्यास तत्काळ पोलीसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र निस्वादे, पोहवा प्रफुल उफ, पो.शि. कांचन चाफले, पो.शि. नितीन नखाते, पो.शि. उमेश खामनकार आणि पो.शि. राहुल माताघरे यांनी केली.