पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) तर्फे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन
नावेद पठाण मुख्य संपादक
सिंदी (रेल्वे) – देशातील ऐक्य, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) यांच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे २५० नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सकाळी ६ वाजता बसस्टँड चौकातून पिपरा पुलापर्यंत ४ किमी अंतराची स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत पुरुष गटातून सचिन झाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर महिला गटात रोशनी ढोबळे, प्रौढ गटात सुधाकर वाघमारे, आणि बाल गटात उत्कर्ष मडावी यांनी विजेतेपद मिळविले. तसेच मोहन सुरकार आणि इतर १८ स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
विजेत्यांना पारितोषिके जिल्हा शांतता समिती सदस्य अशोकबाबू कलोडे, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी अश्विनी आईटवार, पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे आणि प्रफुल्ल डफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. सहभागी स्पर्धकांना कॅप, पाणी बाटल्या, केळी आणि बिस्किट पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.