वर्धा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : देशी-विदेशी दारूसह सव्वा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा – शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धाडसी कारवाई करत देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणारी एक कार जप्त केली असून, एकूण ₹16 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहरातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे परिसरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची कार (एम. एच. 36 झेड 5999) समता नगर परिसरात देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.
या माहितीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत समता नगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली. काही वेळातच नमूद क्रमांकाची कार दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक आणि सोबतचा इसम पोलिसांची चाहूल लागताच कार घेऊन पळून गेले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून ती कार शोधून काढली. कार मिळून आली असली तरी दोन्ही इसम पसार झाले होते.
कारची पंचांसमक्ष तपासणी केल्यावर टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम.एल.च्या बाटल्यांचे 51 खोके (किंमत ₹5,10,000) तसेच महिंद्रा एक्सयूव्ही पांढरी कार (किंमत ₹11,50,000) असा एकूण ₹16,60,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत PSI शरद गायकवाड, विशाल सवई, पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, पोलीस नाईक पवन लव्हाळे, तसेच पोलीस शिपाई श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे आणि अभिषेक मते यांनी विशेष परिश्रम घेतले.