खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे बिघड़ले बजेट.. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाववाढ झाल्याची तेलव्यापाऱ्यांची बतावणी..

Breaking News महाराष्ट्र

खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे बिघड़ले बजेट..

युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाववाढ झाल्याची तेलव्यापाऱ्यांची बतावणी..

प्रतिनिधी:निखिल ठाकरे

हिंगणघाट :-युक्रेनच्या युद्धभूमीवर रशियाने मारा सुरूच ठेवला असून त्या कारणाने महागाई भडकल्याचा दावा करीत स्थानिक व्यापाऱ्यांनी आपला फायदा करून घेतल्याचे दिसून येत आहे, हिंगणघाट बाजारपेठेत अनेक जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून व्यापारी नफेखोरी करीत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगणघाट बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव हे उच्चतम पातळीवर आहेत,युक्रेन व रशिया दरम्यान युद्ध सुरू होण्यापूर्वी स्थानिक बाजारपेठेत सोयाबीन खाद्य तेलाचा भाव जवळपास १५४ रुपये प्रति किलो असा होता, तळागाळातील गोरगरीब जनता स्वस्त असलेल्या सोयाबीन तेलाचा वापर करीत असते परंतु एक आठवड्याचे आतच १७६ रुपये प्रति किलो असा भाव झाला आहे.
येत्या काळात पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे,व्यापारी तेलाचे भाव युद्धजन्य परिस्थिती मुळे वाढत असल्याचे खुलेआम सांगत आहेत परंतु तसा कुठलाही प्रकार नाही युद्धाशी सोयाबीन तेलाचा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे ही भाववाढ कृत्रिम असल्याची जाणीव होत आहे. स्थानिक अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांनी सुद्धा युद्धामुळे कोणतेही भाववाढ झाल्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे.
बाजारपेठेचा मागोवा घेतला असता भाववाढीसाठी खाद्य तेलाची अवाजवी साठेबाजी हेच कारण असल्याचे दिसून येत आहे, काही काळापूर्वी केंद्र सरकारने साठेबाजीवर अंकुश लावित व्यापाऱ्यांना साठेबाजी करण्यावर निर्बंध लागू केले होते परंतु व्यापारी लॉबीने आपल्या फायद्यासाठी सरकार विरोधी मोहीम राबवून केंद्र सरकारकडून हे निर्बंध मागे घेण्यात यश प्राप्त केले.
या अनिर्बंध साठेबाजीमुळे व युद्धाचा बहाणा समोर करीत व्यापाऱ्यांनी तेलाची काळेबाजारी सुरु केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भाववाढीमुळे मात्र मध्यम वर्गीय तथा गरीब वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून गृहिणींचे बजेटही बिघडल्याचे दिसून येत आहे.
रशिया युक्रेन दरम्यान युद्ध सुरूच असून या युद्धामुळे भाव वाढ करण्याची आयतीच संधी व्यापाऱ्यांना भेटली आहे,येता काळ सणासुदीचा आहे लवकरच लग्नसराईसुद्धा सुरू झाली आहे, कोरोनाचे निर्बंध सरकारने मागे घेतल्यामुळे लग्नसराई सुद्धा जोरात राहणार आहे,याची जाण ठेवून व्यापाऱ्यांनी साठेबाजी करणे तसेच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करणे हे नवीन नाही.
शासनाने मात्र याकडे लक्ष देऊन व्यापाऱ्यांवरती लक्ष केंद्रित करून साठेबाजी वर आळा घालावा अशी जनतेची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published.