स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या न्यायहक्क मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:वर्धा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर रोजी चरखागृह, वर्धा येथे आयोजित न्यायहक्क मेळाव्याने बांधकाम कामगारांच्या हक्कलढ्यात नवा इतिहास रचला. या भव्य मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक बांधकाम कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या न्यायहक्कांसाठी एकजुटीचा गर्जनारा आवाज दिला.
या मेळाव्याला आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, तसेच ओमप्रकाश यादव, गुंडू कावळे, यशवंतराव झाडे, अटल पांडे, राणा रणनवरे, संजय गाते, अविनाश देव आणि आशिष ठाकरे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कामगारांनी या मेळाव्यात फसवी ऑनलाईन प्रणाली बंद करून त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, तसेच कंत्राटदारांना अभय देणाऱ्या मंडळाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशा विविध मागण्यांसह आक्रोश व्यक्त केला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी या प्रसंगी बांधकाम कामगारांच्या ज्वलंत समस्या, शासन योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, आणि मंडळातील अन्यायकारक व्यवहार याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की
बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कांसाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत हा लढा थांबणार नाही. स्वाभिमानी संघटना अन्यायाविरुद्ध सदैव उभी राहील
अध्यक्ष अग्निहोत्री यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील कामगारांकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक नाकारले जाते, ज्यामुळे शासन आदेशाचा अनादर होतो आहे. यावर तातडीने कारवाई करून ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच, दि. ८ मार्च २०२५ रोजी जारी केलेला अन्यायकारक पेन्शनसंबंधी शासन निर्णय रद्द करून, बांधकाम कामगारांसाठी सन्मानजनक पेन्शन योजना लागू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
हा मेळावा बांधकाम कामगारांच्या न्यायहक्क चळवळीला नवचैतन्य देणारा ठरला असून, जिल्ह्यात नव्या जोशाची लाट निर्माण झाली आहे.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी राजू मुठाळ, दिलीप कोरे, नरेंद्र मानकर, मारोती मुठाळ, देवश्री ठाकरे, खटेश्वर देवलकर, मनीषा कोंबे, आशिष बुरबुरे, अरविंद गौळकर, नीलिमा पळसकर, रजनी पोकळे, भास्कर गणोरे, दिनेश धुर्वे, सुनील नेहारे, भारत पाल, श्रीकांत पाल, नितीन ढगे, अतुल रेवसकर आणि विजय आष्टनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.