राजुरा–गडचांदूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, महिला वाहक गंभीर

Thu 01-Jan-2026,05:10 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर:राजुरा येथून गडचांदूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस क्रं एमएच ३४ वाय ५३२१ या वाहनाचे ३१ डिसेंबर रोजी राजुरा–गडचांदूर मार्गावरील नाईकनगरजवळ भीषण अपघातास बळी पडली.

बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घसरले, त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत बसमधील सात प्रवासी जखमी झाले असून, महिला वाहकासह चालकही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त बस ही राजुरा आगाराची असून बस चालक उमेश कुक्षीकांत होता. या अपघातात महिला वाहक प्रिया पोपटे (वय ३२) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच चालक उमेश कूक्षिकांत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातात जखमी मध्ये उमेश कुक्षिकांत (चालक), प्रिया पोपटे (वाहक), किष्या इटकेलवार (१७), मंजुषा डोहे (४१), शुभांगी मोहूर्ले (२९), माला राठोड (५८), नारायण कनाके व सुंदराबाई इटकेवार. उर्वरित जखमींवर राजुरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य केले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ राजुरा–गडचांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, वाहनांच्या तांत्रिक देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर बस यापूर्वी एक फेरी पूर्ण करून परतली होती; मात्र दुसऱ्या फेरीपूर्वी आवश्यक तांत्रिक तपासणी न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजुरा आगारातील हेड मिस्त्री संजय मडावी हे अप्रेंटिसशिपवरील युवकांकडून काम करून घेत असल्याने वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप चालक व वाहक संघटनांकडून होत आहे.

तसेच, अपघातानंतर आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सुरक्षेच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या तांत्रिक बिघाडासह प्रशासनिक दुर्लक्षाचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरत आहे.