गांजा विक्री करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन (वर्धा) यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविली.
दि. 18 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट येथील संतोषी माता मंदिराजवळ एन.डी.पी.एस. कायद्याच्या तरतुदींचे काटेकोर पालन करून छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान आरोपी निशांत संजय रीठेकर (रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट) व त्याचा अल्पवयीन साथीदार संशयास्पद स्थितीत आढळून आले. पंचासमक्ष कायदेशीर झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा अंमली पदार्थ मिळून आला. चौकशीत त्यांनी सदर गांजा नागपूर येथील कमाल चौक परिसरात राहणाऱ्या विनायक नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी खरेदी केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी आरोपी व अल्पवयीन बालकाच्या ताब्यातून 514 ग्रॅम गांजा, पल्सर 220 मोटरसायकल (क्र. एम.एच. 40 बी.झेड. 8616) व मोबाईल असा एकूण अंदाजे 1,75,280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी व अल्पवयीन बालकाविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक आदी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.