रझाकारी शमविणारे रामानंद तीर्थ कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल

Thu 22-Jan-2026,02:16 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

 हिंगोली : वसमत मराठवाडा मुक्ति संग्रामाचे जननायक, निष्ठावान शिक्षणतज्ज्ञ ब्र.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील गंगाप्रसादजी अग्रवाल सर्वोदय कार्यालयात दि. २२ गुरूवारी अभिवादन करण्यात आले.  महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, नशामुक्त भारत अभियान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस खादीचा सुत्रहार अर्पण करण्यात आले. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे महामंत्री विशाल अग्रवाल, जिल्हा अध्यक्षा शुभदा सरोदे, राधाकिशन हंचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामीजींचे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते. शालेय शिक्षण सोलापूर पुण्यात घेतांना लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव पडला. १९२० मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या असहकार चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले. पुढे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून 'लोकशाही' विषयावर प्रबंध लिहून एम.ए. पूर्ण केले. सुरुवातीच्या वर्षांत त्यांनी एन.एम. जोशी यांचे सचिव म्हणून कामगार चळवळीत सहभाग घेतला आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. १९३२ मध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि 'स्वामी रामानंद तीर्थ' हे नाव धारण केले. संन्यासी असूनही सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य पार पाडले. हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून त्यांनी निजामच्या हुकूमशाहीविरुद्ध आणि रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध जनतेला संघटित केले. या लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला, तरी त्यांनी अहिंसक चळवळ सुरूच ठेवली. निजामशाहीचा अंत आणि हैदराबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीन करण्यात स्वामी रामानंद तीर्थ यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचु कार्यपद्धती शिस्तबद्ध होती. तत्कालीन स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या सारखे नेतृत्व निर्माण झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले, मात्र सत्तेचा हव्यास नव्हता. दुर्गम भागात शिक्षण पोहोचवण्यासाठी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' स्थापन केली. अंबाजोगाई येथे 'योगेश्वरी नूतन विद्यालय' सुरू केले. तत्कालीन सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे शालेय शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सान्निध्यात पार पडले. खादीचे वस्त्र, स्वतःची कामे स्वतः करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य निदर्शनास आल्याचे विशाल अग्रवाल म्हणाले. फक्त राजकीय स्वातंत्र्यच नाही, तर सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी ते आधारस्तंभ ठरले. मराठवाडा विद्यापीठ स्थापनेसाठी केलेले प्रयत्न त्यांची दूरदृष्टी दर्शवतात. निःस्वार्थ आणि सात्विक जीवनप्रवासामुळे ते आजही दीपस्तंभ ठरतात.