सरस्वती विद्यालयात सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
समुद्रपूर | प्रतिनिधी : निखिल ठाकरे
सरस्वती विद्यालयात वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून माननीय डॉ. वसंत बोंडे (माजी आमदार तथा अध्यक्ष, ग्राम गौरव शिक्षण संस्था, हिंगणघाट) उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून माननीय सौ. वर्षाताई गणवीर (सरपंच, ग्रामपंचायत वडगाव), माननीय गजानन उमाटे (टीव्ही 9 रिपोर्टर व माजी विद्यार्थी), तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय उल्हास कोठमकर (उपसरपंच, ग्रामपंचायत हिवरा), धनराज कोल्हे (माजी मुख्याध्यापक), राजेश झाडे (मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय शेगाव) तसेच अरविंद कोपरे उपस्थित होते.
या आनंददायी सोहळ्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रशेखर निमट यांनी केले. त्यांनी सांगितले की, स्नेहसंमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून शाळेच्या कुटुंबीयांचा स्नेह, विद्यार्थ्यांची सृजनशीलता व कलागुणांचा उत्सव आहे. सरस्वती विद्यालय पाईकमारी ही केवळ शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली एक संस्कारशाळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती श्री. साळवे यांनी दिली. यावेळी विभागीय व राज्यस्तरीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरण हे विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ असल्याने त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सौ. वर्षाताई गणवीर यांनी केले.
विशेष अतिथी माननीय गजानन उमाटे यांनी आपल्या मनोगतात जिद्द, चिकाटी, सचोटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणताही विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले. सरस्वती विद्यालय व संस्थेच्या मार्गदर्शनामुळेच आपण या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे सांगत, संस्थेकडून मिळालेला पुरस्कार हा आजपर्यंत मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपेक्षाही अधिक मोलाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन कुमारी चैताली थूटे (इयत्ता नववी) व कुमारी पलक शेंडे (इयत्ता सातवी) यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी पूर्वा राऊत (इयत्ता नववी) हिने केले.
या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.