वेळीच धावून आली मदत : वर्धा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचले

Tue 03-Feb-2026,06:49 AM IST -07:00
Beach Activities

वेळीच धावून आली मदत : वर्धा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचले

वर्धा | जिल्हा विशष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा दि. ०३ फेब्रुवारी २०२६ वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांनी वेळेवर मदत करून जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचवत मानवतेचे उत्तम दर्शन घडवले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये वर्धा वाहतूक पोलीस सेलू–सेवाग्राम–पवणार मार्गावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईसाठी आज दुपारी सुमारे ५ वाजता पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पवणार पुलाजवळ एका दुचाकीस्वाराची मोटारसायकल घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील व वाहनचालक स्वप्नील तंबाखे यांनी तात्काळ रस्त्यावर पडलेल्या जखमी इसमास सुरक्षित ठिकाणी हलवले. तसेच मोटारसायकल (क्र. MH-27 BS-1502) रस्त्याच्या कडेला हलवून वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेतली.

तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी राजेंद्र कुबळे (वय ५० वर्षे, रा. सुरगाव, जि. वर्धा) यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमीचा रक्तस्राव आटोक्यात आला व त्याचे प्राण वाचले.

जखमी इसमाचे भाऊ विजय रंगराव कुबळे (रा. सुरगाव) यांना घटनास्थळी बोलावून जखमीची मोटारसायकल, मोबाईल व इतर साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या तात्काळ मदतीबद्दल त्यांनी वर्धा वाहतूक पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

दरम्यान, वर्धा वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, हेल्मेटचा नियमित वापर करावा व अपघातमुक्त प्रवासासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.