केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित भारत’कडे नेणारा भक्कम रोडमॅप – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Sun 01-Feb-2026,09:48 PM IST -07:00
Beach Activities

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित भारत’कडे नेणारा भक्कम रोडमॅप – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दिशा दाखवणारा असून ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न साकार करण्यासाठी उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. या अर्थसंकल्पामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सी.ए. राजेंद्र भूतडा व अशोक कलोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांची मांडणी नसून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच जिल्हा व ग्रामीण स्तरावर पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे.

यावेळी आमदार राजेश बकाने यांनी अर्थसंकल्पातील मध्यमवर्गीयांच्या हिताच्या तरतुदींवर प्रकाश टाकला. मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प असून, ग्रामीण भागातील रस्ते, सिंचन, आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी व युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना सांगितले की, ग्रामीण व शहरी भागांचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साधणे हेच या अर्थसंकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला असून, उद्योजकांना नवीन संधी आणि युवकांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली आहे. वर्धा जिल्ह्यातील उद्योग व कौशल्य विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

एकूणच हा अर्थसंकल्प देशाचा वेगवान, समावेशक व संतुलित विकास साधणारा असून वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केला.