समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माय-लेकाचा दुर्दैवी अंत
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माय-लेकाचा दुर्दैवी अंत
वर्धा (येळाकेळी) | प्रतिनिधी : युसूफ पठाण
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील चालक व त्यांची वृद्ध मातोश्री अशा माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताचा तपशील :
ठिकाण : समृद्धी महामार्ग, चॅनेज क्रमांक ३९/९०० (नागपूर कॉरिडोर), म.पो. केंद्र येळाकेळी जाम, जि. वर्धा
दिनांक व वेळ : रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६, सकाळी सुमारे ६.२० वाजता
अपघातग्रस्त वाहने : कार (क्र. MH-05-AX-7612) व कंटेनर (क्र. MH-46-CL-1556)
घटनेची हकीकत :
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद हनुमंत कणबर्गी (वय ५६) हे आपली आई आशालता हनुमंत कणबर्गी (वय ८४, दोघेही रा. रामनगर, नागपूर) यांच्यासह ठाणे येथून नागपूरकडे कारने प्रवास करीत होते. पहाटे सुमारे ६.२० वाजता चालकाला झोपेची डुलकी लागल्याने मिडल लेनमध्ये पुढे चाललेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
जिवितहानी व मदतकार्य :
धडक इतकी भीषण होती की आशालता कणबर्गी यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक विवेकानंद कणबर्गी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, प्रकाश चौधरी व सहकारी कर्मचाऱ्यांनी (HC/1398, HC/1418, PC/1079) रुग्णवाहिका व क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी विवेकानंद यांना तातडीने सावंगी येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
वाहतूक व पोलीस कार्यवाही :
अपघातानंतर महामार्ग पोलीस, MSF व QRV पथकाने तातडीने मदतकार्य करून अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून घटनेची माहिती सेलू पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
महामार्ग पोलिसांचे आवाहन :
लांब पल्ल्याच्या प्रवासात थकवा जाणवत असल्यास किंवा झोप येत असल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून विश्रांती घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.