कचऱ्याचे विलगीकरण करून बायो-रिसायकलिंग प्रक्रिया राबवा – संदीप काळे यांची मागणी

Thu 18-Dec-2025,04:27 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

कारंजा (घा.) : कारंजा घाडगे शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची दयनीय अवस्था तसेच शहराच्या दर्शनी भागातील सर्व्हिस रोडलगत साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता पाहून आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विलगीकरण करून त्यावर बायो-रिसायकलिंग प्रक्रिया राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

शहराच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा डेपो असल्याने शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कचरा डेपोपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर विठ्ठल मंदिर, साई मंदिर ही धार्मिक स्थळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, धान्याचे शासकीय गोदाम तसेच तहसील कार्यालय स्थित आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा या कचरा डेपोत आग लागण्याच्या घटनाही घडल्या असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

सध्या शहरातून गोळा करण्यात येणारा कचरा थेट शहराच्या दर्शनी भागातील कचरा डेपोत नेऊन ढिगाऱ्याच्या स्वरूपात साठविला जातो. मात्र या कचऱ्याचे कोणतेही विलगीकरण केले जात नसून त्यावर रिसायकलिंग किंवा शास्त्रीय प्रक्रिया राबविली जात नाही. परिणामी दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा विचार करता सदर कचरा डेपो शहराबाहेर हलवावा तसेच कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून बायो-रिसायकलिंग प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी ठोस मागणी संदीप काळे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केली आहे. नागरिकांना कचऱ्याच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी नगरपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.