महानगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण? वंचित–शिवसेना (उबाठा) युतीची चर्चा रंगात
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून संभाव्य आघाड्यांबाबत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीच्या महानगर कार्यालयात पार पडली.
या बैठकीत दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणूक संयुक्तपणे लढवण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. निवडणुकीत एकत्र उतरल्यास जागावाटप कसे करावे, यावरही प्राथमिक विचारमंथन झाले. ५०-५० टक्के समसमान जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
स्थानिक स्तरावर समन्वय ठेवून एकत्रित रणनीती आखण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भर दिला.
वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या पुढाकाराने शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला लाभली. वंचितकडून जयदीप खोब्रागडे, तनुजा रायपुरे, रूपचंद निमगडे, सुभाषचंद्र ढोलणे, तर शिवसेनेकडून सुरेश पचारे, माजी जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, युवा सेना अध्यक्ष विक्रांत सहारे उपस्थित होते.
या बैठकीनंतर चंद्रपूरच्या राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य आघाडी झाल्यास शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी ३३ जागांवर उमेदवार देण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेचे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.