कराटे खेळात प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Sun 28-Dec-2025,11:00 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

कराटे सामाजिक कौशल्य विकसित करणारा प्रभावी खेळ : नगराध्यक्ष सुधीर पांगुळ

वर्धा : कराटे हा केवळ क्रीडा प्रकार नसून तो शारीरिक, मानसिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचे एक प्रभावी माध्यम आहे. आत्मसंरक्षणासाठी कराटे अत्यंत उपयुक्त असून यामुळे विशेषतः महिला व मुले अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासू बनतात. कराटेमुळे मानसिक संतुलन, भावनिक नियंत्रण तसेच सामाजिक कौशल्यांचा विकास होतो, असे प्रतिपादन वर्धा नगरपालिकेचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले.

ते दिनांक 28 डिसेंबर रोजी एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमी, हवालदारपूरा, वर्धा येथे स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया व एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमी, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवनभाऊ तिजारे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक व ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधरजी पाटील, दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाशजी खंडार, विश्व सिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदासजी आहुजा, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, सहसचिव हरीश पाटील, सभासद प्रवीण पेठे, खेमराज ढोबळे, सुनील चंदनखेडे, उमेश चौधरी, गॅरंटी इंग्लिश स्पीकिंगचे संचालक शामभाऊ पटवा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा जिल्ह्याच्या सन 2025-26 या कालावधीत आंतरशालेय व फेडरेशनस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. बारामती (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांमध्ये देवांशू प्रकाश लाखे आणि 19 वर्षांखालील मुलांमध्ये पियुष अनुज सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच दिल्ली येथे झालेल्या फेडरेशनच्या क्षेत्रीय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पियुष सुजित हवालदार याने रौप्य पदक, कु. आयुषी अजय कूरटकर हिने कास्य पदक मिळवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्पर्धेत गायत्री अवसरे हिने प्रथम क्रमांक मिळवून पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

याशिवाय प्रतीक कन्नाके, रुजान बाघमोरे, भार्गव खेवले, जानवी नांदुरकर, रोमिशा वाघमारे आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना पदके व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हा संघटनेचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाराष्ट्र शाखा सल्लागार सेन्साई चेतन जाधव व रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रास्तावना चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक भगत यांनी केली. संचालन कु. जानवी नांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक भगवानदासजी आहुजा यांनी केले.