वायगाव येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण व सायबर सुरक्षेचे धडे

Thu 24-Sep-2026,12:04 AM IST -07:00
Beach Activities

वायगाव येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण व सायबर सुरक्षेचे धडे

ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालयात विशेष मार्गदर्शन; 1930 व 112 हेल्पलाइनच्या वापराबाबत जनजागृती

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वायगाव (निपाणी) येथील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण, इंटरनेट व डिजिटल जगतातील धोके, वाहतूक नियम तसेच कायद्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत 1930 आणि 112 या हेल्पलाइन क्रमांकांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा तसेच पॉक्सो (POCSO) कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला भरोसा सेलच्या मार्गदर्शक तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी वाघाडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना आणि ममता उपस्थित होत्या.

दैनंदिन जीवनात सतर्क कसे राहावे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क कसा साधावा, याची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत देण्यात आली. यावेळी 1930 सायबर क्राईम हेल्पलाइन आणि 112 आपत्कालीन हेल्पलाइन यांच्या वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

ऑनलाइन सायबर फसवणूक किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला व मुलांवरील अत्याचार, सुरक्षिततेचा धोका, अपघात किंवा तत्सम आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी चाइल्ड लाइनच्या माधुरी शंभरकर यांनी बालहक्क व बालसंरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा गैरप्रकार सहन न करता वेळेत मदत मागावी, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमास ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालयातील 450 हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.