आदिवासी तरुणीवरील कथित अत्याचाराची विशेष चौकशी करण्याची मागणी
आदिवासी तरुणीवरील कथित अत्याचाराची विशेष चौकशी करण्याची मागणी
नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा
वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून एका आदिवासी तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची विशेष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शरद आडे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून एका आदिवासी तरुणीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला वर्धा शहरातील मध्यवर्ती भागातील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अनेक व्यक्तींनी बलात्कार व अत्याचार केल्याची माहिती प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला असून, प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निष्पक्ष तपास करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, घटना प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी तत्काळ होणे अपेक्षित असताना ती रात्री साडेआठ वाजल्यानंतर झाल्याची माहिती पुढे येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या विलंबाचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रकरणाचा तपास विशेष चौकशी समितीमार्फत तातडीने व निष्पक्षपणे करण्यात यावा, प्रकरणात निष्पन्न होणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित तरुणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने प्रकरणातील तथ्य व लागू कायदेशीर तरतुदींनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गतही योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तपासात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा झाल्यास वर्धा जिल्ह्यातील आदिवासी व परिवर्तनवादी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनकर्ते :
शरद आडे, जिल्हाध्यक्ष, वर्धा
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली
चंद्रशेखर मडावी,
विदर्भ अध्यक्ष,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली