सालोड-हिरापूरमध्ये देहव्यवसायाचा पर्दाफाश; महिला आरोपी अटकेत, तरुणीची सुटका

Fri 25-Sep-2026,04:55 AM IST -07:00
Beach Activities

सालोड-हिरापूरमध्ये देहव्यवसायाचा पर्दाफाश; महिला आरोपी अटकेत, तरुणीची सुटका

वर्धा : प्रतिनिधी युसूफ पठाण

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने सालोड-हिरापूर परिसरातील तक्षक सिटी येथे कारवाई करून देहव्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेला अटक केली. या कारवाईत एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून, आरोपीकडून रोख रक्कम व दोन मोबाईल फोनसह एकूण ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना २४ सप्टेंबर रोजी माहिती मिळाली होती की, सालोड-हिरापूर परिसरातील तक्षक सिटी येथे एक महिला पैशांचे आमिष दाखवून तरुणींकडून देहव्यवसाय करून घेत आहे. माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.

तक्षक सिटी येथील बी-विंगमधील फ्लॅट क्रमांक १०३ येथे छापा टाकला असता प्रतिभा समीर कवडे (वय ४०, रा. गॅस गोडाऊनजवळ, सिंदी (मेघे), वर्धा) हिला ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान दोन अँड्रॉइड मोबाईल फोन, २ हजार ९०० रुपये रोख आणि देहव्यवसायाशी संबंधित साहित्य असा एकूण ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुटका करण्यात आलेल्या तरुणीला सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला सखी वन स्टॉप सेंटर, महिला व बाल विकास विभाग, वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकूर तसेच AHTU आणि LCB वर्धा पथकाने केली.