वसमत आगाराच्या लांब पल्ल्याच्या बसमध्ये चार आसने गायब,महिला आरक्षित व सर्वसाधारण आसनांचा पत्ताच नाही
प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत आगाराची MH-20-BL-3967 क्रमांकाची बस वसमत-परभणी-जालना - छत्रपती संभाजीनगर मार्गे पुण्याकडे जात असताना बसमधील महिला आरक्षित आसन क्रमांक २९, ३० तसेच सर्वसाधारण आसन क्रमांक ३५, ३६ अशी तब्बल चार आसने उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसच्या देखभाल-दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांसाठी निर्धारित केलेली आसनेच गायब असल्याचे आढळणे ही केवळ प्रवाशांची गैरसोय नसून बसची तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते? असा सवाल उपस्थित करणारी बाब आहे.
विशेषतः महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेली आसने उपलब्ध नसतील, तर आरक्षणाची अंमलबजावणी आणि प्रवाशांच्या सुविधांची जबाबदारी कोणाची.? बस मार्गावर पाठवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहनाची योग्य तपासणी केली जाते का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का.?
बसच्या देखभाल प्रक्रियेत आगार प्रमुख, वाहन परीक्षक, हेड मेकॅनिक आणि बॉडी फिटर यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत असून संबंधित बस मार्गावर सोडण्यापूर्वी तिची आसनव्यवस्था व प्रवासी सुविधा तपासण्यात आल्या होत्या का, तपासणी झाली असल्यास चार आसने गायब असताना बस मार्गावर कशी सोडण्यात आली, याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी होत आहे.
एसटी महामंडळाच्या मालमत्तेची योग्य देखभाल न झाल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
वरिष्ठ अधिकारी आता तरी जागे होणार का.?
प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करून बस मार्गावर पाठवण्याची ही पद्धत नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे,बसची तपासणी करणाऱ्या यंत्रणेला चार आसने दिसली नाहीत की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, हा तपासाचा विषय आहे,या संपूर्ण प्रकाराची तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, संबंधित दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आता प्रश्न एवढाच एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार का, की चार गायब आसनांप्रमाणे जबाबदारीही ‘गायब’ होणार?