भरधाव एसटी च्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sat 26-Sep-2026,10:35 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : काही क्षणांपूर्वीपर्यंत सोबत असलेल्या मित्रासोबत सुखरूप प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारावर नियतीने अचानक घाला घातला. दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले आणि अवघ्या काही क्षणांतच मागून आलेल्या एसटी बसने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने दीपक विठोबा चनफणे (४२, रा. मंगरूळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले नरेश प्रभू कोहळे (३२) जखमी झाले.

ही हृदयद्रावक घटना शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनोली बुद्रुक गावाजवळील जंगल परिसरात घडली.

दीपक चनफणे आणि नरेश कोहळे हे दोघे तळोधी-बाळापूर येथे खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून दुचाकी क्रमांक एमएच-बीक्यू-४१२४ने ते मंगरूळकडे परतत होते. सोनोली बुद्रुकजवळील जंगल परिसरात मांगुर्डे येथील मित्राला भेटण्यासाठी ते रस्त्यावर थांबले होते. त्याचवेळी अचानक दुचाकीचा तोल गेला आणि दोघेही रस्त्यावर कोसळले.

दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याची घटना घडते न घडते तोच चिमूर–तळोधी मार्गावरून एसटी बस क्रमांक एमएच-०७-सी-९४७७ तेथे येऊन धडकली. रस्त्यावर अचानक व्यक्ती पडल्याचे लक्षात येताच चालकाने बस बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपक चनफणे रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्याने ते एसटीच्या मागील चाकाखाली आले. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

काही क्षणांपूर्वी सुरू असलेला प्रवास अचानक मृत्यूच्या दाढेत संपल्याने मंगरूळ परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड येथे पाठविण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.