साहित्याची जपणूक ही एक सांस्कृतिक चळवळ : खासदार अमर काळे

नावेद पठाण मुख्य संपादक
आर्वी:भारत हा विविध भाषा व संस्कृतींनी नटलेला देश असून, भारतीय एकता आणि अखंडतेचे वैशिष्ट्य जगात अद्वितीय आहे. आपल्या विविधांगी संस्कृतीचे संगोपन व संवर्धन हीच भारताची खरी ओळख आहे. साहित्य आणि संस्कृती या नाण्याच्या दोन बाजू असून, साहित्य समाजाला आपली सांस्कृतिक भूमिका कायम ठेवण्यास मदत करते. लेखक आणि कवींची भूमिका यात मोलाची असल्याचे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले.
ते ३ सप्टेंबर रोजी वर्ध्याचे नामवंत साहित्यकार इमरान राही यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन “पायम-ए-राही” हा तिसरा काव्यसंग्रह सादर केला, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार काळे पुढे म्हणाले की, “कुठल्याही राष्ट्राची सांस्कृतिक ओळखच त्या राष्ट्राचे भवितव्य निश्चित करते. साहित्यकार इमरान राही यांनी हिंदी-उर्दू साहित्यसेवेबरोबरच सांस्कृतिक संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, हे एकप्रकारे राष्ट्रनिर्मितीचाच भाग आहे.”
या प्रसंगी ऑल इंडिया शास्त्रीय सोशल फोरमचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय नाखले, ज्येष्ठ समाजसेवक नाजीम शेख, राजू लभाने, नामदेव आखाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.