आरमोरीत आढळला दुर्मिळ कॅमेलियन सरडा

Fri 29-Aug-2025,01:56 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी - वडसा महामार्गावर शेताजवळील झुडपातून दुर्मिळ सरडा रस्ता ओलांडत असल्याचे कामानिमित्य वडसेला जात असलेले वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सहसचिव तथा सर्पमित्र दिपक सोनकुसरे यांना दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास निदर्शनास आले. हा सरडा दुर्मिळ असून फार कमी प्रमाणात आढळून येत असतो. या सरड्याविषीयी समाजात गैरसमज असल्याने याला विषारी समजून मारले जाते त्यामुळे ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.हा दुर्मिळ सरडा कॅमेलियन जातीचा असल्याचे नजरेस आल्याने याची माहिती आरमोरी येथील वन्यजीव मित्र देवानंद दुमाने यांना देण्यात आली. या सरड्याला सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. या दुर्मिळ सरड्याचे जगात १८ कुळे असून सरड्याच्या ४५०० प्रजाती आहेत. ग्रीन कॅमेलियन सरडा त्वचेखाली असलेल्या रंगद्रव्यामुळे रंग बदलण्यात माहिर असणारा सरडा असे या प्रजातीला ओळखले जाते. वातावरणानुसार रंग बदलत जाणारे सरडे अनेक असले तरी हा हिरवा रंगाचा सरडा दुर्मिळ समजला जातो. हा सरडा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सरडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाने तो आपल्या रंगाची छटा बदलतो. ह्या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढऱ्या काट्याची ओळ दिसून येते.किडे व फुलपाखरू असे प्रामुख्याने खाद्य असलेल्या या सरडा प्रजातिला चपळ समजले जात असले तरी हिरवा सरडा मात्र संथ व अलगद चालतो. गवताच्या रंगरुपात एकरूप होत असल्याने तो सहसा नजरेला येत नाही. आठ ते पंधरा सेंटिमीटर इतकी लांबी असते. या सरड्याचे अस्तित्व आपल्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसून येते.कॅमेलियन सरड्याबद्दल अनेक गैरसमज आहेत हा सरडा विषारी आहे. प्राण्यांना चावला तर प्राणी मरतो,माणसाच्या डोक्याला हा चावतो असे समज असले तरी ते सगळे चुकीची असून हा सरडा पूर्णतः बिनविषारी असून तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करतो. अशी माहिती वृक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, सहसचिव दिपक सोनकुसरे यांनी दिली आहे.