वर्धा नदीच्या पुराने शेकडो एकर शेती पाण्याखाली

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर :बल्लारपूर तालुक्यात जून-जुलै महिन्यात समाधानकारक पावसामुळे शेतशिवार हिरवेगार झाले होते. कापूस, सोयाबीन, तूर, धान आदी खरीप पिके बहरली होती. मात्र निसर्गाचा दिलासा क्षणिक ठरला. वर्धा नदीने कोपलेल्या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.वर्धा नदीलगतची सुपीक शेती पुराने गिळंकृत केली आहे. विशेषतः चारवट, हडस्ती, नांदगाव, विसापूर, बल्लारपूर, बामणी, दहेली या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोरडवाहू शेती करणारे शेतकरी निसर्गाच्या दयेवर असतात. आता पुराने त्यांच्या उपजीविकेलाच तडा दिला आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश -मारोती वाढई, पिडीत शेतकरी हडस्ती म्हणाले, वर्धा नदीच्या पुराने गावालगतची शेती उध्वस्त केली. सुपीक जमीन खरडून गेली. भाड्याने शेती करावी लागते. पिक हाताशी येत नाही, परिणामी कर्ज काढून शेती करावी लागते. शेतकऱ्यांची खरी दैना झाली आहे.प्रशांत अटकारे, हतबल शेतकरी यांनी सांगितले, मेहनतीने उभी केलेली शेती पुराने डोळ्यादेखत वाहून नेली. आमचा भविष्याचा आधारच संपला. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आता जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने तरी तात्काळ कर्जमाफी करावी.पुरामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांच्या शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला असून त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत व कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.