स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,अट्टल घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Fri 02-Jan-2026,12:31 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठाण 

वर्धा,वरोराबुटीबोरी परिसरातीलघरफोडीचे गुन्हे उघड,₹१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा : वर्धा जिल्ह्यात वाढत चाललेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहिती व सखोल तपासाच्या आधारे वर्धा, वरोरा व बुटीबोरी परिसरातील एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून सुमारे ₹१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सावंगी (मेघे) पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याने या प्रकरणाला तोंड फुटले. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी रोहित विलासराव चंदनखेडे (वय २५, रा. विजय लॉन्स जवळ, सावंगी मेघे, ता. जि. वर्धा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी यांची पत्नी व मुलगा दुपारी सुमारे २.३० वाजता नवीन घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बाहेर गेले होते. सुमारे एक तासाने परत आल्यानंतर घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून कुलूप तोडल्याचे स्पष्ट झाले.

घरातील लोखंडी रॅकमधून सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (अंदाजे ₹२४ हजार) व रोख ₹४५ हजार असा एकूण ₹६९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९६०/२०२५ अन्वये कलम ३०५(अ), ३३१(३) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा अज्ञात आरोपींनी केल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक तपास व गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. तपासादरम्यान विशाल उर्फ बबलू राम गायकवाड (वय २२) व आदित्य राम गायकवाड (वय २०, दोघे रा. कैकाडी नगर, मनीष नगर, नागपूर) यांचा सहभाग उघडकीस आला. त्यांच्यासोबत दोन विधीसंघर्षित बालकही गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर येथे रवाना होऊन बर्डी मार्केट परिसरातून आरोपींना दोन वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी देवळी, वर्धा शहर, सेवाग्राम, वरोरा (जि. चंद्रपूर) व बुटीबोरी (जि. नागपूर) पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून ₹१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, तसेच पोलीस अंमलदार व सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसणार असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.