७९ वा होमगार्ड व नागरी संरक्षण दल सप्ताह उत्साहात साजरा

Fri 02-Jan-2026,07:13 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : वर्धा ७९ वा होमगार्ड व नागरी संरक्षण दल सप्ताह दिनांक २४ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र, शांती स्तूप, लक्ष्मीनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. हा सप्ताह सदाशिव वाघमारे, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

या सप्ताहाअंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरात ७० पुरुष व ३५ महिला होमगार्ड सहभागी झाले होते. सलग कवायती, शिस्तबद्ध प्रशिक्षण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा समादेशक होमगार्ड यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमात होमगार्ड जवानांनी केलेल्या रक्तदान, सामाजिक सेवा व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड दलाकडून १०० टक्के योगदान दिले जात असून, भविष्यातही अशाच निष्ठेने कार्य करून होमगार्ड संघटनेचे नाव अधिक उज्वल करावे, अशी अपेक्षा जिल्हा समादेशक सदाशिव वाघमारे यांनी व्यक्त केली.

होमगार्ड संघटनेची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी मुंबई येथे झाल्याचे सांगून, जनतेतून जनतेच्या संरक्षणासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही संघटना पोलीस यंत्रणेला मोलाची मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वर्गीय मोरारजी देसाई यांनी रोवलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज देशपातळीवरील वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महामहिम राष्ट्रपतींचा संदेश वरिष्ठ फलटण नायक बाबा तुरक यांनी वाचन करून उपस्थितांना ऐकविला. तसेच सन २०२५ मध्ये सेवानिवृत्त झालेले मानसेवी अधिकारी मधुकर बागेश्वर, सुरेश कोपरकर, उमेश कांबळे व रेखा मानवटकर यांचा सत्कार करण्यात आला.

सप्ताहादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

शिवमंदिर, लक्ष्मीनगर परिसरात स्वच्छता अभियान, यामध्ये नगरपरिषद सदस्य विलास आगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिरात २२ पुरुष व महिला होमगार्ड यांनी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविण्यात मोलाचा सहभाग दिला.

हिंगणघाट पथकात योग शिबिराचे आयोजन, योग प्रशिक्षक वसंतराव पाल यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

बिडकर कॉलेज येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन व शुद्ध वातावरणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद वानखेडे (केंद्र नायक), संजय सुरोसे (प्रशासकीय अधिकारी), प्रदीप बलवीर (पलटण नायक), अनंत गजबे (प्रमुख लिपिक), हेमलता कांबळे (समादेशक अधिकारी), कैलास रोकडे (समादेशक अधिकारी, हिंगणघाट), मनोहर ढवळे (कंपनी कमांडर), फिरोज खान पठाण (वरिष्ठ फलटण नायक), चंद्रकांत पिंजरकर, वसंत नाईक, गजानन ससाने, नितीन शेंडे, चंद्रशेखर शेलकर, सारिका चांबटकर, रंजना करपाते तसेच सर्व पुरुष व महिला होमगार्ड यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.