दारू सोडा,दूध प्या! वर्ध्यात अंनिसचा अनोखा प्रबोधनात्मक संदेश
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठाण
वर्धा : वर्धा थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली होणाऱ्या मद्यपानाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) वर्धा शाखेच्या वतीने बजाज चौकात ‘दारूचा नाही, दुधाचा’ हा अनोखा प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढणारे मद्यसेवन, त्यातून होणारे अपघात व कुटुंबांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अंनिसने समाजप्रबोधनावर भर दिला. या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ आणि पोलीस अधिकारी मा. तले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
दारूऐवजी दूध पिण्याचा सकारात्मक संदेश देत मान्यवरांनी स्वतः रस्त्यावरील नागरिकांना दूध वाटप केले व व्यसनमुक्तीचे आवाहन केले. व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडून तंदुरुस्त शरीर व सुखी कुटुंब घडवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून अंनिस व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्य करत असून, या मोहिमेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमास अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, अरुण चवडे, सारिका डेहनकर यांच्यासह अंनिसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“व्यसनाला बदनाम करा, आरोग्याला सलाम करा!” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.