अवैध दारू वाहतुकीवर रामनगर पोलिसांची धडक कारवाई; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Wed 23-Sep-2026,06:08 AM IST -07:00
Beach Activities

अवैध दारू वाहतुकीवर रामनगर पोलिसांची धडक कारवाई; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

नावेद पठाण मुख्य संपादक,वर्धा 

वर्धा शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दाम्पत्यावर पोलिसांनी कारवाई करून एकूण ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी आर्वी रोडवरील शाहू हॉस्पिटल परिसरात करण्यात आली.

रामनगर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, पांढरकवडा पारधी बेडा येथून एक दाम्पत्य काळ्या-निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून गावठी मोहा दारू घेऊन पिपरी मेघे मार्गे आर्वीनाका, वर्धाकडे येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह शाहू हॉस्पिटल, आर्वी रोड परिसरात नाकाबंदी केली.

दरम्यान, संशयित मोटारसायकल येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. मोटारसायकल चालक रंजित नेहरु राऊत (वय ३७) आणि त्याची पत्नी शालु रंजित राऊत (वय ३७), दोघेही रा. पांढरकवडा पारधी बेडा, वर्धा, अशी त्यांची ओळख पटली.

पोलिसांनी पंचांसमक्ष मोटारसायकलची तपासणी केली असता दोन बॅगमध्ये तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये एकूण ३० लिटर गावठी मोहा दारू आढळून आली. या दारूची किंमत ६ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली हिरो ग्लॅमर मोटारसायकल (एमएच ३२ एव्ही १०४९) अंदाजे ७० हजार रुपये, तसेच दोन बॅग ६०० रुपये असा एकूण ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९४४/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ)(ई), ८३ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अजहर खान करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक पूर्णिमा राखोंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

कारवाईत पोलीस हवालदार गजानन इवनाथे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार अजहर खान, पोलीस अंमलदार सचिन पवार, राहुल भोयर, रुपेश उगेमुगे आणि महिला पोलीस अंमलदार सुरेखा डोंगरे सहभागी होते.