गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना (उबाठा)–वंचित आघाडीची युती जाहीर

Sun 09-Nov-2025,11:03 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत औपचारिकरित्या युतीची घोषणा केली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा ८ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. या वेळी शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काँग्रेस तालुका अध्यक्ष उत्तम पेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. लोकाभिमुख विकास आणि युवकांना संधी देणे हे आमचे ध्येय आहे. गडचांदूरच्या नागरिकांना सशक्त नेतृत्व देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे या नेत्यांनी सांगितले.

यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यासाठीही या आघाडीत सामील होण्याचे दार खुले असल्याची घोषणा करण्यात आली. ते आमच्यात सामील झाल्यास त्यांचे स्वागत आहे, असे सर्व नेत्यांनी एकमुखाने सांगितले.

या युतीच्या घोषणेमुळे गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण झाले असून, भाजपपुढे कठीण आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

या वेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोळे, तसेच वंचित आघाडीचे शहर प्रमुख प्रशिक रामटेके उपस्थित होते.