वर्धा शहर पोलीसांची धडाकेबाज कारवाई — ७.८१ लाख रुपयांची दारू आणि कार जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सिद्धार्थनगर परिसरात देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दारू व कार जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सिल्व्हर रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (MH-32-Y-2541) ही सिद्धार्थनगर परिसरात देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.
या माहितीवरून पंचांच्या उपस्थितीत सिद्धार्थनगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली. काही वेळातच संशयित कार येताना दिसली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच चालकाने कार वेगाने पळवून नेली. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता ही कार लक्ष्मीनगर आलोडी परिसरात उभी आढळली. मात्र, त्यात कोणीही व्यक्ती मिळून आली नाही.
कारची पंचासमक्ष तपासणी केली असता, वेगवेगळ्या कंपनीच्या देशी व विदेशी दारू-बिअरच्या २५ पेट्या (किंमत २,४०,००० रुपये) आणि टॅंगो पंच कंपनीच्या ९० एमएलच्या १५ निपा (किंमत १,५०० रुपये) असा एकूण २,४१,५०० रुपयांचा माल मिळून आला. तसेच जप्त कारची किंमत ५,४०,००० रुपये असून, एकूण मुद्देमालाची किंमत ७,८१,५०० रुपये एवढी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक संतोष ताले, प्रभारी पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत PSI शरद गायकवाड, विशाल सवई, पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, महिला पोलीस हवालदार अक्षय सावळकर, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे, अभिषेक मते यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.