SSC-HSC परीक्षेतील उत्कृष्ट निकालाबद्दल सनशाइन स्कूलचा विशेष प्रशस्तीपत्राने गौरव
SSC-HSC परीक्षेतील उत्कृष्ट निकालाबद्दल सनशाइन स्कूलचा विशेष प्रशस्तीपत्राने गौरव
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
सेवाग्राम : सनशाइन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेवाग्राम, वर्धा यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या SSC व HSC बोर्ड परीक्षांतील उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय निकालाबद्दल विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे, विभागीय सचिव रविंद्र सोनटक्के, वर्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री घारफळकर (राऊत) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांच्या हस्ते शाळेला ‘विशेष प्रशस्तीपत्र’ प्रदान करण्यात आले.
सनशाइन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने सेवाग्राम परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत सलग १० वर्षे उत्कृष्ट बोर्ड निकालाची परंपरा कायम राखली आहे. परिसरात सातत्याने उत्तम निकाल देणारी शैक्षणिक संस्था म्हणून शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेषतः SSC बोर्ड परीक्षेच्या निकालात पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत शाळेच्या आजवरच्या कामगिरीतील विक्रम मोडीत काढला. विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या विश्वासाचे फलित असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
या यशामागे शाळेच्या अध्यक्षा तबस्सुम अझमी आणि सचिव आय. आर. अझमी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच संचालक आदिल अझमी यांच्या नियोजन, प्रेरणा आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबतच्या बांधिलकीचेही कौतुक करण्यात आले.
मुख्याध्यापिका कल्पना कोंबे, पर्यवेक्षिका शुभांगी साखरकर, योगिता पाटील, ऋतुजा माटे, रसिका वाघमारे, जीवन अवथरे, नितेश बोंडे, शगुफा काझी, संदीप ठाकूर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे अभिनंदन करण्यात आले. नियमित सराव, चाचण्या, शंका निरसन, अतिरिक्त मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक नियोजनामुळे हा उत्कृष्ट निकाल साध्य झाल्याचे शाळेच्या वतीने नमूद करण्यात आले.
सलग १० वर्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा आणि SSC परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय संख्या ही शाळेच्या शैक्षणिक कामगिरीचे वैशिष्ट्य ठरली आहे. विशेष प्रशस्तीपत्र मिळाल्याने शाळेच्या संपूर्ण परिवारात आनंदाचे वातावरण असून, यापुढेही उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.